राजापुरात वायंगणी शेतीला सुरुवात

राजेश पालशेतकर
0
राजापूरः तालुक्‍यात भात कापणी आणि झोडणीची कामे बहुतांश पूर्ण झाली असून आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी अर्थात वायंगणी शेती करण्यास सुरूवात केली आहे. कुळीथ तसेच अन्य कडधान्य, कलिंगड, भुईमुग अशा पिकांबरोबर भाजीपाला पेरण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे भातकापणीनंतर सध्या शेतकरी पुन्हा एकदा नांगरणी व पेरणी करताना दिसत आहेत. तालुक्‍यात पावसाळ्यामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भातशेती बरोबर दुपीक म्हणून काही शेतकरी आपल्या भरड असलेल्या जमिनीत भाजीपाल्याची शेतीही करतात. यावर्षी सर्वच ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईची झळ वायंगणी हंगामाची शेती करणार्‍या शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर सोसावी लागणार आहे. असे असले तरी तालुक्‍यातील शेतकरी ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत आहे त्या ठिकाणी वायंगणी शेती करत आहे. काही ठिकाणी वहाळावर वनराई बंधारे बांधून त्यामध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर शेतीसाठी केला जातो. शासकीय स्तरावरून सुध्दा वनराई बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या वनराई बंधार्‍यांमध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग विहीरींची भूजल पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. तसेच या साठवणूक केलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सध्या भात कापणी आणि झोडणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वायंगणी शेती करायला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी तर पेरणी होऊन लागवडही केली गेली आहे. शेतकरी नांगरणी करून आवश्यक असलेले बी बियाणी पेरत आहे. थंडीचा हंगाम असल्याने पडणार्‍या दवावर सुध्दा अंकुर येणारी पिके सध्या शेतकरी पेरत आहे. राजापूर शहरानजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिक घेतलं जातं. भातकापणीनंतर शेतकर्‍यांनी भाजीपाला पिक घेण्यास सुरूवात केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top