रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे फासकी तोडुन फासकीसह आंबा बागेत आलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. बिबट्या फासकी तोडुन बागेत निपचित बसला होता. बागेत फिरणाऱ्या गुरख्याच्या तो निदर्शनास आला. वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर रेक्स्यू करून बिबट्याला पिंजऱ्यात घेतले. परंतु थोड्या वेळातच बिबट्या मृत झाला.
फासकी लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून वन विभागाने त्याचा शोध सुरू केले आहे. फणसवळे येथे आज सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा बागेत गुरखा फेरीत होता. तेव्हा बिबट्या फासकी तोडून फासकीसह बागेत बसलेला दिसून आला.
याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी, यानी जागेवर जाऊन खात्री केली असता बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली. बिबट्या फासकी तोडून आलेल्याचे निदर्शनास आले. बिबट्या हा मोठमोठ्याने धापा टाकत होता. तसेच निपचित पडत असलेला दिसून आला. तत्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून घेण्यात आला. पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या ग्रामस्थांना बाजूला करण्यात आले. पिंजरा व जाळीच्या साह्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध झाला. काही वेळातच वेळात बिबटय़ा मृत झाला.आंबा कलमाच्या बागेला सभोवर दगडी बांध असून त्यावर काटेरी कुंपण आहे.
बिबट्या मृत झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी झाडगाव यांचेकडून शव विच्छेदन करून घेतले. बिबट्या हा नर होता. तो सुमारे सात वर्षे वयाचा होता. मृत शरीर सर्व अवयवासहित जाळून नष्ट करण्यात आलेले आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत आहे. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सावंत, भाटले, हवालदार पालवे, होमगार्ड पालते व नाखरेकर यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थ पोलिस पाटील सुजाता आंबेकर यांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, रेस्क्यू टीम अनिकेत मोरे, महेश धोत्रे हे उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाला तात्काळ कळविणे बाबत गिरिजा देसाई यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या नंबर वर कळवावे, असे आवाहन केले आहे.