ग्राहक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू: झगडे

राजेश पालशेतकर
0

 

ग्राहकांची जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. याबरोबरच पुरवठादारांनी देखील नैतिक दृष्टिकोनातून पारदर्शकपणे आपला व्यवसाय चालवला पाहिजे. ग्राहकांनी आपले शोषण होण्यापासून वाचून इतर ग्राहकांना जागृत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपला संघर्ष कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, तो अनुचित व्यापारी प्रथा आणि वाईट वृत्तीविरोधात असावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांनी केले. ते गुहागर तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पुरवठा निरीक्षक समृद्धी पेंडसे, सहाय्यक महसूल अधिकारी श्रीम. शिंदे मॅडम, सहाय्यक महसूल अधिकारी जयवंत कदम आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी अपर्णा गोयथळे, चैताली आरेकर, ऋणाली बागकर आदी उपस्थित होते.

श्री. झगडे पुढे म्हणाले की, ग्राहक हा राजा आहे, पण त्याला आपल्या हक्कांची आणि अधिकारांची माहिती नसते. ग्राहकांसाठी बनवलेले कायदे आणि त्यांची जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहकाला त्याच्या फसवणुकीची माहिती नसते. कायदे ग्राहकांच्या बाजूने आहेत आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी देखील आपल्याकडे आहेत. मात्र, ग्राहक त्या अधिकारांपर्यंत पोहोचत नाहीत, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. सोन्याच्या बाजारात आणि कपड्याच्या बाजारात ग्राहकांची हमखास फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना पावती घेणं आवश्यक आहे. पावती कशी असावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे ग्राहकांनी नेहमी सजग राहणे आवश्यक आहे. ग्राहकाची सजगता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 रोजी संसदेत एकमताने मंजूर करण्यात आला आणि हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या कायद्याच्या निर्माणासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन श्री. झगडे यांनी सांगितले की, गेली 48 वर्षे हजारो कार्यकर्ते ग्राहक जागृतीसाठी कार्यरत आहेत.

गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याला ग्राहकांसाठी एक प्रभावी शस्त्र मानले आणि त्याचा योग्य वापर शिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कायद्याने दिलेले अधिकार समजून घेतले पाहिजे आणि त्या बरोबरच आपल्या कर्तव्यांचीही जाणीव असावी. कायद्यानुसार विविध अधिकार प्राप्त करण्याचे उदाहरणे देऊन त्यांनी ग्राहकांच्या कर्तव्यासंबंधी मार्गदर्शन केले. जर ग्राहकांची फसवणूक झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आयोगात दावा कसा दाखल करावा, याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.

ग्राहक दिनानिमित्त गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने ग्राहक जनजागृती, कर्तव्य व जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात गार्गी क्षीरसागर, मयुरी कडव, आणि वेद सुर्वे यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाले, तर माध्यमिक गटात उर्वी बागकर, कार्तिकी भोसले, आणि अक्षरा रोहिलकर यांना क्रमांक मिळाले. विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top